भुसावळ : पोलीस वृत्त ऑनलाईन –भुसावळ येथे एका प्रेमी युगुलांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने विष प्राशन केल्याने तिचे निधन झाले. हे वृत्त कळताच प्रियकराने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना येथे उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीवरून शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाहबद्ध होणार होते.
शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केल्याने तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.
काजलच्या मृत्यू झाल्याचे कळताच कुणाल मनोज भालेराव याने तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.