शिंदखेडा: पोलीस वृत्त ऑनलाईन तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन तरुणीशी मैत्री करून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या भावी पतीलाही जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने, तरुणीचा विवाह मोडला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध शिंदखेडा पोलिस स्टेशनला ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२२ मध्ये एके दिवशी बसने महाविद्यालयात जात होती. त्याचवेळी गावातील तरुणाने बसमध्ये तरुणीच्या गळ्यात हात टाकून त्याचा फोटो मोबाइलमध्ये काढला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने नकार दिल्याने, त्याने तिला शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पिकावर फवारणी करण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळीच तिला रुग्णालयात दाखल केल्याचे तिचे प्राण वाचले होते. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी तिला मामाच्या घरी पाठवून दिले होते. मात्र, वार्षिक परीक्षेसाठी ती गावी आली असता, संशयित तरुणाने पुन्हा तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीचा नात्यातील मुलाशी विवाह ठरला होता. हा विवाह मार्च २०२४ मध्ये होणार होता. मात्र, संशयित तरुणाने तरुणीच्या भावी पतीची भेट घेऊन, माझे तिच्याशी प्रेम असून, आम्ही लग्न करणार आहोत, असे सांगत, तू जर तिच्याशी लग्न केले तर तुला जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीचा जुळलेला विवाह तुटला.
तरुणीच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश सूर्यवंशी करीत आहेत.


