शहादा येथील पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीत असलेल्या शहर बीट अंमलदाराच्या कॅबिनमध्ये ठेवलेले लॅपटॉप व टीव्ही संच चोरट्याने छताचे कौल काढून लंपास केल्याची घटना रविवारी रोजी पहाटे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या वस्तू धाडसी चोरी करीत लांबविण्यात आल्याने पोलिस वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शहादा पोलिस ठाण्याचे वर्षभरापूर्वी नवीन इमारतीत स्थलांतर झाले. त्यामुळे पूर्वी असलेल्या मध्यवर्ती भागातील इमारतीत बराच सामान पडून आहे. शहर बीट हवालदार यांच्यासाठी याच ठिकाणी एक खोली ही कायम ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलिसांनी एक लॅपटॉप आणि टीव्ही संच ठेवला होता.
संशयित चोरटा रामसिंग बालू सोनवणे (२६) रा. वडछील, ता. शहादा याने खोलीच्या छताचे कौल काढून आत प्रवेश करीत लॅपटॉप व टीव्ही संच लंपास केला. बीट हवालदार तेथे गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ठिकठिकाणी तपास केल्यानंतर रविवारी सायंकाळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत पोलिस कर्मचारी दिनकर चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने रामसिंग बालू सोनवणे (२६) रा. वडछील, ता. शहादा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास हवालदार किरण पावरा करीत आहे. दरम्यान, पोलिसांच्या कॅबिनमधून चोरट्याने चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात शहादा शहरात चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत.


