ममुराबाद ग्रामपंचायत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव, दि.१९ – तालुक्यातील ममुराबाद गावात ममुराबाद ग्रामपंचायत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनतर्फे नुकतेच दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात दिवसभरात तब्बल १०० वर दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या समाजकार्याचे प्रशिक्षणार्थींचा एक गट गेल्या काही महिन्यांपासून ममुराबाद गावात समाजकार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात गावात १२७ दिव्यांग महिला, पुरुष आणि बालक आढळून आले होते. दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व्हावी यादृष्टीने नुकतेच ममुराबाद ग्रामपंचायत, धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी ममुराबाद गावाचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामसेवक कैलास देसले, लोकसेवक मधुकरराव समाजकार्य महाविद्यालयाचे क्षेत्रकार्य समन्वयक प्रा.डॉ.नितीन चौधरी, क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा.डॉ. शाम सोनवणे आदी उपस्थित होते. शिबिरात गोदावरी फाउंडेशनचे डॉ.रिषभ पाटील, डॉ.वेदांत पाटील, डॉ.शुभम फावणे, डॉ.अमर यांनी दिव्यांगांची आरोग्य तपासणी केली. विशाल शेजवळ यांनी सहकार्य केले. शिबिरात दिव्यांग रुग्णांचे कान, नाक, घसा, डोळे, हाडे, रक्तदाब, हृदयरोग तपासणी करण्यात आली. तपासणीत १३ दिव्यांग रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी, डॉ.शाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेतल पाटील, खुशबू महाजन, घनश्याम पवार, कल्पेश वाघ, अजिंक्य भालेराव, महेश सोनवणे, योगिता नांदे आदींनी परिश्रम घेतले.