शिरपूर: पोलीस वृत्त ऑनलाईन- शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रुग्णवाहिकेतून(ambulance)होणारी गायीची तस्करी रोखत दोघा परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रुग्णवाहिकेतील दहा गायींची गो शाळेत वानगी करण्यात आली.
विजय प्रल्हाद चौहान (२९) व विक्रम बालाराम चौहान दोघे (रा. महू मालवीनगर, ता. महू, जि. इंदूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपींची नाव आहे. दरम्यान, गुरे तस्करांनी कारवाई टाळण्यासाठी आता चक्क रुग्णवाहिकेचा वापर सुरू केल्याने पोलिसांना आता अधिक सतर्क रहावे लागणार आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गुरांची रुग्णवाहिकेतून तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवार, १६ रोजी पहाटे हाडाखेड चेक पोस्टवर सापळा लावला.
रुग्णवाहिका (एम.पी.०९ बी.ए.०९८१) ही सेंधव्याकडून • शिरपूरच्या दिशेने येत असताना पथकाने तिला अडवल्यानंतर विचारणा केले असता चालकाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. पथकाने रुग्णवाहिका तपासली असता त्यात दहा गायी आढळल्याने आल्याने वाहन ताब्यात घेण्यात आले तर दोघांना अटक करण्यात आली. दहा गायींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, जयराज शिंदे, रफिक मुल्ला, कैलास जाधव, चालक मिर्झा, संजय भोई आदींच्या पथकाने केली.


