जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांनी आज १६ मंगळवार रोजी जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून नुकसान भरपाईसाठी न्यायधीशांकडे १ रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी वारंवार खोटे विधाने करून मला छळन्याचे काम केले असून त्यांनी बदनामीकारक वक्तव्य करून समाजात माझी बदनामी केली आहे. मागच्या काळात माझ्या आजारपणाबद्दल आणि मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्यांनी शंका उपस्थित केली. माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल देखील त्यांनी संशयास्पद वक्तव्ये केली. म्हणून मी त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला असल्याचे एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांची किंमत माझ्या लेखी एक रुपयांचीही नाही, म्हणून मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीसाठी भरपाई म्हणून एक रुपयांचा दावा दाखल केला आहे, असे खडसे म्हणाले.

