जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. ७.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने जपानचं अतोनात नुकसान झालं आहे. शेकडो लोकांच्या मृत्यू झाला होता. भूकंपानंतर किनारपट्टीवरील लोकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या भूकंपानंतर समुद्रच मागे हटल्याचं समोर आलं आहे. तब्बल ८०० फूटांपेक्षा जास्त समुद्र मागे सरकला आहे. सॅटलाईट छायाचित्रांमध्ये किनारपट्टी पहिल्या पेक्षा अधिक मोकळी झाल्याच स्पष्ट दिसत आहे.
भूकंपामुळे अनेक किनारे कोरडे पडले असून बोटींना किनाऱ्यावर पोहोचणं कठीण झालं आहे. भूकंप आणि त्सुनामीनंतर नोटो बेटांवर हे भूवैज्ञानिक बदल दिसून आले आहेत. ही एक धोकादायक स्थिती असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. नाहेल बेलघेर्ज यांनी आपल्या एक्स ट्विटर हॅन्डलवर याचे फोटो शेअर केले आहेत. सॅटलाईट फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की ज्या ठिकाणी पूर्वी समुद्राचं पाणी होतं तो भाग आता कोरडा पडला आहे. सुमारे ८२० फूट समुद्राचं पाणी मागे सरकलं आहे, दोन फूटबॉल मैदानाच्या आकाराइतका भाग कोरडा पडला आहे.