पोलीस वृत्त ऑनलाईन: मालदीव सरकारनं मंत्री मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान यांना निलंबित केलं आहे. यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले.
मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नावे आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान तीन मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारने हे पाऊल उचलले.
दरम्यान, मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांसंदर्भाने घाणेरडी कमेंट केली अन् वाद चिघळला. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली. जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. ‘चांगले पाऊल. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीझ यांनी म्हटले.