धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन:-(प्रतिनिधी) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून धरणगाव तालुक्यातील तालुक्यातील कल्याणे होळ येथे दाम्पत्यासह मुलाला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली असुन महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कल्याणे होळ येथे सरिता मनोज कापडणे(Sarita kapdne) (वय-३१) या महिला पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शेजारी राहणारे भाईदास जगन कापडणे यांच्याशी वाद झाला. याच रागातून भाईदास कापडणे, छोटू जगन कापडणे, सिमाबाई, पौर्णिमा, सुनंदाबाई, मिलींद, जगन खंडू कापडणे, आणि कलाबाई (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कल्याणे होळ यांनी सरिता कापडणे यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा यांना चुलीतील लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.
हा प्रकार घडल्यानंतर दाम्पत्याला जळगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सरिता कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.


