जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापाला आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याने बापाने आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केली. एवढेच नाही मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि बापाला पोलिसांनी अटक झाली. हा प्रकार जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथे रविवारी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालक्यातील हरीनगर तांडा येथील गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या बापाचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव(Gokul Jadhav) याला दोन मुली आहेत. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. रविवार, १० रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत (dr Sandip kumawat) हे मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमरडीला मारल्याची कबली दिली.
गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिला. तिला झोळी झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.


