अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – शहरात मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात मनसोक्त संचार सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक अत्यंत त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
शहरात मोकाट गुरांचा प्रश्न जुनाच आहे. सातत्याने हा प्रश्न वेळोवेळी उद्भवत असतो मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी सध्या माेकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवस-रात्र मोकाट गुरे सर्वत्र फिरतात. रस्त्यांच्या मध्यभागी बसतात. काही वेळा बसलेल्या गुरांची संख्या माेठी असल्याने वाहनधारकांना वाहने थांबवून मार्ग काढावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण होते.
काल सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ समोर रस्त्यावर अनेक गुरे रस्त्याच्या मध्यभागी बसल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहरात या मोकाट गुरांमुळे अनेक ठिकाणी समस्या उद्भवत असतात पालिका व पोलिस प्रशासनांनी संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे. मोकाट गुरांच्या मालकांच्या शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही शहरातील नागरिकांकडून हाेत आहे. मुख्याधिकारी यांनी पालिका कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे.