माझं गाव-माझी बातमी: कोणतेही गाव आले म्हणजे त्या ठिकाणी तरुणांची संख्या मुबलक प्रमाणात असते. जुनी पिढी मात्र या तरुणाईच्या नावे बोटे मोडत असते. व्हाट्सअप व फेसबुकच्या जमान्यामध्ये तरुणाई पूर्ण अखंड बुडालेली आहे. अनेक तरुण व्यसनाधीन झालेले आहेत. अशा प्रकारची ओरड सर्वत्र होत असते. मात्र याला अपवाद अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील तरुण आहेत. साधारण शंभर ते दीडशे तरुण एकत्र येऊन विधायक कार्यासाठी हातभार लावतात. चैत्र शुद्ध चतुर्दशीला गावातील सप्तशृंगी देवीची यात्रा भरते. संपूर्ण गाव हा यात्रोत्सवात आनंद व मौजमजा करत असते. हे सर्व करून गावातील तरुण एकत्रितपणे गावातीलच हनुमान मंदिरावर अर्थात चावडीवर एकत्र आले. तेव्हाच त्यांनी मंदिराची साफसफाई व संपूर्ण मंदिर परिसर झाडलोट करून केरकचरा बाहेर फेकून हनुमान जन्मोत्सवासाठी सुसज्ज केला. त्यांच्यामध्ये ना कोणी नेता, ना कोणी पुढारी सर्व काही स्वयंस्फूर्तीने तरुण हाताला येईल ते काम करत होते. हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळपासूनच सुरू होतो. अगदी सकाळी लावण्यापासून तर रात्री संपूर्ण गावाला जेवणापर्यंत (प्रसादापर्यंत) तरुण अंग मेहनत करत होते. अगदी प्रत्येक तरुणाला असे वाटत होते की हे माझ्या घरचे लग्न आहे. तेथे वाढती पासून तर पत्रवाडी उचलेपर्यंत सर्व कामे गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने केले. गावातील कोणत्याही जेष्ठ व्यक्तीची सांगण्याची गरज नाही. पाच हजार ते सहा हजार लोकांना महाप्रसादाचा लाभ देऊन श्रमदान केले. धन्य ते तरुण. ज्यांनी हनुमान जन्मोत्सवासाठी परिश्रम घेतले.





