जळगाव: महिला व बालविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे करण्यात आले. 2013 पासून सदर पुरस्कारांचे वितरण हे तांत्रिक अडचणी मुळे थांबलेले होते. अमळनेर तालुक्यातीलसामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक जयश्री साळुंके दाभाडे यांना 2013-2014 साठी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, मानपत्र,10001/- रू चा धनादेश, शाल श्रीफळ, पुष्पगच्छ असे असून हा पुरस्कार तालुक्यातून व जिल्हयातून प्राप्त करणाऱ्या प्रा दाभाडे ह्या एकमेव मानकरी आहेत.
या संदर्भात प्रा जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान शासनातर्फे केला जातो. प्रा दाभाडे ह्या सातत्याने वंचित, दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला आहे.अनेक आंदोलने,उपोषण, अर्ज, निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे.वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ,पैसा,बुद्धिमत्ता इ समाज,वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय,शासकीय पातळीवर घेण्यात आली असून 57 पुरस्कार प्रा दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत.आता हा 58 वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात शासनाने दखल घेऊन रोवला आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमन मित्तल, मुख्याधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रा जयश्री दाभाडे यांना मिळालेल्या ह्या जिल्हास्तरीय पुरस्काराने निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेर चे नाव शासन दरबारी गेले आहे.प्रा दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
प्रतिक्रिया…
मला मिळालेला हा शासनाचा जिल्हास्तरीय सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.आजचा हा पुरस्कार मी माझे पती राजेंद्र साळुंके यांना समप्रित केला आहे.माझे पती राजेंद्र यांचे खूप मोठे पाठबळ मला होते. आजपर्यंत मी केलेल्या प्रत्येक कामात त्यांची साथ अनमोल होती. नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. असे असले तरी मी त्यांच्या इच्छेप्रमाणे सदर पुरस्कार स्विकारला कारण जेंव्हा 2014मध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता तेंव्हा त्यांनी मी ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तुझ्या सोबत असेन असा शब्द दिला होता. पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हत.. कोणत्याही वाईट परिस्थितीत त्यांनी मला पुरस्कार घेण्यास परवानगी दिलीच असती.. म्हणून आज मी अत्यंत जड मनाने पुरस्कार स्विकारला व कार्यक्रमातच तो त्यांना समर्प्रित केला….
गेल्या अनेक वर्षात मी माझ्या कार्यात उसंत घेतली नाही. पुरस्कारांनी जबाबदारी वाढते.अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.अर्थातच काम करत असताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अश्या पुरस्कारांमुळे नव्याने उत्साह निर्माण होतो. अमळनेर करांनी मला खूप प्रेम व सहकार्य दिले आहे.त्यामुळे मी कार्य करू शकते असेच सहकार्य असू द्यावे.