यावल : प्रतिनिधी
येथील लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधू साडेतीन लाखांचा ऐवज घेऊन पसार झाली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाणी गल्लीतील बबलू गर्गे या युवकाचा नाशिक येथील मुलीशी ३१ जानेवारी रोजी बऱ्हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे विवाह झाला होता. २ फेब्रुवारी रोजी येथील फालकनगरातील ब्युटी पार्लरमध्ये पतीने या नववधूस सोडले. पती तिला एका तासाने घेण्यास गेला असता ती तेथून गायब झालेली आढळली. घरातून तिने साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे व पथकाने दोन महिलांसह चार जणांना अटक केली. त्यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्या. एम. एस. बनचरे यांनी दिले आहेत.