जळगाव (प्रतिनिधी) : कलाकार, कलाकृती आणि रसिक ही तीन तत्त्वे सांस्कृतिक सादरीकरणात फार महत्त्वाची आहेत. कलाकार उत्तम कला सादर करतो. रसिक त्यास उत्तम दाद देतो. मानवी भावना प्रकट करण्याचे नृत्य हे प्रभावी माध्यम आहे. लोकनृत्यातून समाजाची संस्कृती, राहणीमान, विचारसरणी प्रकट होत असते, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा वकील ग्राहक सहकारी संस्था लिमिटेडचे अध्यक्ष अँड. संजय राणे यांनी केले.
कलादर्पण संस्था प्रस्तुत ‘ऋतुरास’ या नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे अँड. राणे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. केतन ढाके, माजी अध्यक्ष अँड. एल.बी.वाणी, नृत्य दिग्दर्शिका अँड. डॉ. महिमा मिश्रा, पदमनाभन अयंगार उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी नटराज पूजन करून दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कोमल खाडे व प्रेरणा शेरवानी यांनी कला दर्पण संस्था व कार्यक्रमाविषयी प्रस्तावनेतून माहिती सांगितली.
उद्घाटक अँड. संजय राणे म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध व सांस्कृतिक परंपरा लाभलेली भूमी मिळाली आहे. सामाजिक करमणुकीसाठी महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. कलाकार व रसिकाचे नाते समान असते. कलाकार कला सादरीकरण करतो तर रसिक त्यास उत्तम दाद देतो. कला जशी आनंद देणारी असते, तशी रसिकांची दाद देखील प्रोत्साहन देणारी असावी लागते. शास्त्रीय नृत्य प्रमाणेच येथील प्रादेशिक विविधतेनुसार अनेक प्रकारच्या लोकनृत्य परंपरा देखील देशात रुजल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी केतकी पाटील यांनीही मनोगतातून कार्यक्रमाविषयी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन अँड. अनुराधा वाणी यांनी केले तर आभार श्रुती मोहता यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘ऋतुरास’सह विद्यार्थ्यांचे कथक सादरीकरण*
“ऋतुरास” कार्यक्रमात कला दर्पण संस्थेचे विद्यार्थी गौरी जोशी, भावना पाटील आणि सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर अष्टपदी, सरगम यासह अर्धनारीश्वर ही शिवस्तुती सादरीकरण अँड. मिश्रा यांचेसह विद्यार्थ्यांनी केले. तसेच राधा-कृष्ण, गोपिकावर आधारित होरी देखील प्रेरणा फेरवाणी, दर्शना वर्मा आदी विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच भगवान श्रीकृष्णांचे भजन विद्यार्थ्यांनी मनमोहक सुरामध्ये सादर केले.
लहान विद्यार्थ्यांनी कृष्णलीला लीलया पद्धतीने साकारली. यासह सहा ऋतूंचे महत्त्व सांगणारा तसेच पर्यावरण रक्षणाबाबत जागृत करणारा ऋतुरास हा विशेष सादरीकरणाचा कार्यक्रम देखील नृत्यदिग्दर्शक अँड. महिमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रत्येक कलाविष्काराला रसिकांची दाद मिळत होती.
कार्यक्रमात तबल्यावर मनोज कुलकर्णी यांनी, हार्मोनियमवर भूषण खैरनार यांनी साथसांगत केली तर पद्मजा नेवे यांनी सुरेल गायन केले.


