अमळनेर: तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत तर चालक जखमी झाला आहे. चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामाने निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.23 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी हे चालकासह यावल येथून नाशिककडे शासकीय वाहन क्रमांक एम.एच.19 डी.व्ही.4199 ने कामासाठी नाशिक येथे जात होते. अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात चौधरी हे जागीच ठार झाले तर गाडीवरील चालकाला किरकोळ दुखापत झाली.
भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार होता शिवाय यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता या घटनेची संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

