नंदुरबार: धडगाव तालुक्यातील खडक्या (khadkhy) येथील पीडितेवरील बलात्कार आणि हत्येच्या आरोपप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकासह एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याआधी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या या दोघांच्या निलंबनाचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी काढले.

मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची पीडितेच्या वडिलांची तक्रार आहे. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयात कुटुंबीयांच्या मागणीनुसार पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदनदेखील झाले असून न्यायवैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणात याआधी तत्कालीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra vagha)यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली करून चालणार नाही तर त्यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी तत्कालीन निरीक्षक गोकुळ औताडे (gokul autade)आणि उपनिरीक्षक बी. के. महाजन (B.k Mahajan)यांना निलंबित करण्यात आले आहे.

