मुंबई, ता. ३ ःरस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाने नियम अधिक कडक केले आहेत.. शिवाय, दंडाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ केलीय.. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ‘ई-चलान’च्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो. मात्र, आता वाहतूक विभागाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी ई-चलान मशीनऐवजी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश अपर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. वाहनचालकांच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आॅनलाईन पद्धतीनेच दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी राज्यभरात ६ हजार ५०० ई-चलान मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. मात्र या मशीनचा वापरच होत नसून पोलिस कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यावर असताना खासगी मोबाईलचा वापर करून दंडात्मक कारवाई केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कारवाईनंतर स्थळ, वेळ आणि तारखेचा घोळ होत असल्याने वाहतूकदारांकडून तक्रारी केल्या जात आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहतूकदारांचा फोटो काढून ई-चलान मशीनवर अपलोड करण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यामध्ये वाहनाचा प्रकार, स्थळ दिसून येत नसून त्यामध्ये फक्त वाहनाचा क्रमांक दाखवला जात आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या तक्रारी वाढल्या असून ई चलान मशीनचा प्रभावी वापर करून कारवाई करण्याचे नव्याने आदेश देण्यात आले आहे….दुरुस्ती करून घ्या!पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याकडील ई-चलान मशीनबाबत काही समस्या, अडचणी असल्यास संबंधित ई-चलान मशीनच्या जिल्हा स्तरावरील प्रतिनिधीकडे संपर्क करून दुरुस्ती करण्याच्या सूचनासुद्धा या वेळी देण्यात आल्या आहेत….वाहतूकदारांवर कारवाई करताना पोलिस कर्मचाऱ्यांकडून खासगी मोबाईलचा वापर केला जातो, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने असे आदेश काढले आहेत. यापूर्वीसुद्धा खासगी मोबाईलऐवजी ई चलान मशीनचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र आता सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.- कुलवंतकुमार सारंगल, अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक)

