जळगाव:- चालत्या बैलगाडीवर वीज तार पडल्याने विजेचा धक्का बसून बैलासह शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेने संपूर्ण परिसर हादरले
जळगावच्या यावल तालुक्यातील चिखली इथे रस्त्यावरुन बैलगाडी जात असताना अचानक विजेची तार बैलगाडीवर कोसळली.

यावेळी वीजेचा धक्का बसून बैलगाडी हाकणाऱ्या शेतकऱ्यासह बैलाचा जागीच मृत्यू झाला. यशवंत कामा महाजन (वय 65 वर्षे, रा. चिखली बुद्रूक) असं या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेला बैल आणि त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह असं दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
शेतात जात असताना दुर्दैवी मृत्यू
चिखली बुद्रूक इथे यशवंत कामा महाजन हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेतमजुरी काम करुन ते त्यांचा उदरनिर्वाह भागवत होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरुन गेलेली विजेची तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळला. या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा मृत्यू झाला तर या घटनेत बैलगाडीचा एक बैलही जागीच दगावला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील भागवत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

