जळगाव – धुळे महामार्गावर असलेल्या पाळधी जवळ असलेला एसपी वाइन शॉपवर चोरट्यांनी डल्ला मारत व्हेंटिलेटरचा पंखा वाकवत चोरट्यांनी शुक्रवारी तीन लाख ३१ हजारांची दारू, चार लाख रुपये रोख तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केल्याची घटना उडकीस आली. या प्रकरणी पाळधी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, महामार्गावरील पाळधी जवळ असलेला एसपी वाइन शॉपमधील दुकानावरील भागात व्हेंटिलेटरसाठी एक पंखा असून चोरट्यांनी तेथे चढून पंखा वाकवून दुकानात प्रवेश केला. तेथून त्यांनी वेगवेगळ्या कंपनीची एकूण तीन लाख ३१ हजार ७७० रुपयांची दारू तर चार लाख १८ हजार रुपये रोख असा ऐवज लांबवून पोबारा केला. सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. व्यवस्थापक भूषण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस अधीक्षक हृषीकेशकुमार रावले, धरणगावचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी पाहणी केली. दरम्यान, घटनेच्या एक दिवस आधी चोरट्यांनी वाइन शॉप शेजारील गॅरेज फोडून तेथून बॅटरी लांबवल्याची घटना घडली होती.

