जळगाव पोलीस वृत्त तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे (वय-२२, रा. भादली ता.जि.जळगाव) या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याची घटना १० रोजी उघडकीस आली होती. या बाबत गावातील दोन अल्पवयीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या बहिणीची छेडखानी काढत असल्याने त्यांनी दोघांनी संदेशचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

भादली ते जूना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे या तरुणाचा संशास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तरुणाच्या अंगावरील जखमांवरुन त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. खूनाचा उलगडा करण्यासाठी भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भादलीत ठाण मांडून होते. दरम्यान, संदेशचा मित्र कोण त्याच्याशी कोणाचे वाद आहे काय यासह त्याला शेवटचा कॉल कोणाचा होता. याची संपुर्ण माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली.
पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरविताच संदेश आढाळे याचा खून गावातीलच दोन अल्पवयीन तरुणांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या दोघ संशयितांना सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी भादली गावातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, संदेश हा त्या तरुणांच्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरुन त्या दोघांनी संदेशचा खून केल्याची कबुली दिली.

