अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज तालुक्यातील निम गावातील भिल्ल वस्तीत नवरात्रोत्सवानिमित्त स्थापित देवीच्या मूर्तिच्या डोळ्यात अश्रू दिसल्याची घटना घडली. त्यामुळे ही बाब गावात चर्चेचा विषय ठरली. मात्र या घटनेकडे भावनिकतेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
निम गावातील ‘एकलव्य नवरात्र मंडळा’तर्फे कालिका मातेची स्थापना करण्यात आली होती. आरतीदरम्यान काही भक्तांना देवीच्या डोळ्यातून अश्रूसारखा द्रव वाहताना दिसला. हा प्रसंग पाहून काही नागरिक भावूक झाले, तर काहींनी मोबाईलद्वारे व्हिडिओही रेकॉर्ड केला. भक्त दीपक पवार यांनी सांगितले की, हा प्रकार केवळ एकदाच घडला, आणि त्यानंतर मूर्तीत कोणताही बदल दिसून आला नाही. दरम्यान या घटनेकडे अनेकांनी चमत्कार म्हणून पाहिले, परंतु अद्याप या अश्रूप्रमाणे दिसणाऱ्या द्रवाचे शास्त्रीय कारण स्पष्ट झालेले नाही. तज्ञांच्या मते, हवामानातील बदल, आर्द्रता, मूर्तीत वापरलेले रंग किंवा साहित्य यामुळे अशा प्रकारचा द्रव तयार होऊ शकतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सांगतात की, अशा घटना अनेकदा धार्मिक भावनांमुळे चमत्कार म्हणून समजल्या जातात, पण प्रत्येकवेळी अशा गोष्टींना शास्त्रीय आधार असतो.


