धुळे: पोलीस वृत्त न्युज. मैत्रिणीला भेटायला गेलेल्या चार तरुणांना मध्यरात्री डांबून ठेवत जबर मारहाण करण्यात आली, या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कालापाणी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

कमलसिंग वसावे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. यापेक्षा आणखी धक्कादायक म्हणजे कमलसिंग याच्या नातेवाईकांनी त्याचे अंत्यविधी मारहाण करणाऱ्या संशयिताच्या घरासमोरच केले आहेत. कमलसिंग याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह मारहाण करण्यात आलेल्या आरोपींच्या घरासमोरच जाळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये बराच काळ तणावाची परिस्थिती होती.
कमलसिंग वसावे हा आपल्या अन्य तीन मित्रांसोबत त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कालापाणी येथे गेला होता. त्यावेळेस त्यांना रात्रीच्या वेळेस गावातल्या काही लोकांनी पकडले. गावकऱ्यांनी चौघा तरुणांना पकडून मारहाण केली. यावेळी गावकऱ्यांच्या तावडीतून कमलसिंग वसावे हा पळून जात होता, पण त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली गेली.
गावकऱ्यांनी केलेल्या या मारहाणीत कमलसिंग वसावे याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कमलसिंगचा मृतदेह कालापाणी जवळच्या नाल्यात फेकला गेला. याच नाल्यात पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर संतापलेल्या कमलसिंगच्या कुटुंबाने कमलसिंगचा मृतदेह संशयीत आरोपींच्या घराजवळ जाळला, तसंच संशयीतांची घरंही पेटवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

