अमळनेर – पोलीस वृत्त न्युज शिरुड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत, आदरणीय ग्रामस्थ व बोरसे परिवार मित्र मंडळामार्फत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिरुड येथील रहिवासी असलेल्या स्व.माईसो.सौ.मनिषा प्रविण बोरसे मॅडम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी,कोदगाव व भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील जिल्हा परिषद शाळेंत नोकरी केलेली आहे. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या.कामात सचोटी,वक्तशीरपणा व प्रामाणिकपणा यास आधार ठेवून त्यांनी आपली सेवा बजावलेली होती. स्वतःच्या पगारातून खर्च करून नेहमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा व कार्यक्रम घेऊन त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करणे हा त्यांचा आवडता छंद होता. त्या अतिशय संवेदनाशील व कुटुंबवत्सल शिक्षिका होत्या.नोकरी करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी राखत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या स्मरणार्थ असलेल्या या स्पर्धेंत दोघी शाळांमधील एकूण 220 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व प्रत्येक वर्गातून तीन याप्रमाणे 34 विद्यार्थ्यांनी अभ्यास उपयुक्त बक्षिसे मिळवली . तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कृतिशील उपक्रमातून नेहमी प्रोत्साहन देत असल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांना देखील ग्रामस्थांतर्फे शैक्षणिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.मनोगतात मान्यवरांनी मॅडम यांचे बद्दल संवेदना व्यक्त करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवउद्गार काढले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.दत्त दूध उत्पादक सह. सोसायटीचे सेवानिवृत्त सचिव श्री.संतोष बोरसे हे होते. मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक सादर केले.सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. श्रीमती सविता बोरसे यांनी आभार मानले. शेवटी वंदे मातरम या सामूहिक राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा पुष्पलताताई सोनवणे, अतुल सोनवणे, रजनीकांत पाटील , शशिकांत पाटील, विनायक पाटील , पुंजू पाटील, हेमंत सोनवणे ,रविंद्र पाटील,अमोल पाटील,विजय बोरसे ,गणेश बोरसे भूषण बोरसे, ज्ञानेश्वर महाजन,डि.ए. धनगर यांनी सहकार्य केले. प्रा.सुभाष पाटील यांनी आपल्या संवेदना व भावोद्गार पाठवले.ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते.


