पोलीस वृत्त ऑनलाईन : अंगणात खेळत असलेल्या एका २ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून ही घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित मुलगी रडत घरी गेल्याने आई-वडिल तिची विचारपूस करत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली.
कल्याणजवळील टिटवाळा दहागाव परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या एका नराधमाने तिला पाहिले. त्यानंतर तिला थेट निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या नराधमाने या चिमुकलीला होणाऱ्या वेदनांचा कोणताही विचार न करता तिला त्याच ठिकाणी सोडून दिले. त्यानंतर ही चिमुकली वेदनेने विव्हळत घरी गेली.
मुलीला या अवस्थेत पाहून तिच्या आई-वडिलांनी तिची विचारपूस केली. मात्र आपल्याबरोबर नेमकं काय घडलं हे तिला सांगता आलं नाही. ती कुठेतरी पडली असेल, तिला काही लागलं असेल या चिंतेने पालकांनी तिची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तात्काळ या नराधमाला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.