अमळनेर : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. मार्च ते जुलै असे पाच महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच चाऱ्याची व्यवस्था करत असून मक्याच्या कडब्याची सर्वत्र बारीक भुसा(कुट्टी) करून घेत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील पाच ते सहा महिने जनावरांच्या चारा कसा पुरवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करतात़ यात मक्याचा कडबा, बाजरी, ज्वारी, दादरयांचे सलग कडब्याची दरवर्षी साठवण करून ठेवतात. मात्र हा सलग कडबा जनावरांना टाकल्यानंतर कडब्याचे जाड पात जनावरांनी चावले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर या कडब्याची उगार पडत चाऱ्याची नासाडी होत असते.
त्यामुळे शेतकरी आपल्या जवळील पाच ते सात महिने पुरेल व नासाडी होणार नाही. यासाठी कडब्याची यंत्राच्या सहाय्याने बारीक भुसा (कुट्टी) करून घेत आहे. या यंत्राद्वारे कडब्याचा बारीक भुसा तयार होत असल्याने जनावरांना वैरण घातल्यावर याची नासाडी होत नाही. त्यामुळे अमळनेर तालुक्यात यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी चाऱ्याची अश्या पद्धतीने काळजी घेत आहेत. कडबा रचून ठेवल्याने उंदीर व घुशी नासडी करतात मात्र या कुट्टीची साठवण चांगल्या पद्धत्तीने करता येते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने या चाऱ्याची साठवण व काळजी शेतकरी वर्ग घेत आहेत.


