अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन– खरीप हंगामात कमी पाऊस पडून देखील अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त यादीत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मदत व पुनर्वसन मंत्री हे तालुक्याचे असल्यावर देखील तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित न झाल्याने मंत्र्यांनी तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा नाहीतर मंत्री पद सोडावे असे आवाहन किसान काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा अमळनेर तालुक्यात खरीप हंगामात सर्व्यात कमी सरासरी प्रमाण ४४८.९ एमएम एवढा पाऊस झाला.तालुक्यातील आठही मंडळात ४० दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड होता.यामुळे शेतकऱ्यांना ३० टक्क्यांहून कमी उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.त्यामुळे आठही मंडळातील शेतकऱ्यांना आठ हजार रुपये पीक विम्याची अग्रीम रक्कम फक्त अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली.तालुक्याची पाणी पातळी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खालावल्याने संपूर्ण तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे.तालुक्यातील ६५ गावांना नवीन जवाहर विहिरी अद्याप दिल्या गेल्या नाहीत.तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यावर देखील शासनाच्या दुष्काळ ग्रस्त यादीत अमळनेर तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही.अमळनेर तालुक्याचे विद्यमान आमदार व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असतांना देखील तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित न होणे हे मोठे अपयश असून तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय आहे.
तालुक्यातील ६५% जमीन ही मुरमाळ असल्याने तिची पाणी धरून ठेवण्याची कुवत नाही.अश्या मातीत कमी पावसात उत्पन्न ही कमी येते.चाळीसगांव तालुक्याची जमीन सुपीक गुणवत्तापूर्ण आहे.त्यात गिरणा नदीच्या काठावर असल्याने शेती बागायती आहे.गिरणा प्रकल्पात नेहमी पाणीसाठा असल्याने पाण्यासाठी रहिवाश्यांचे हाल होत नाहीत.मात्र त्याउलट अमळनेर तालुक्यात पाणी साठवून ठेवणारा एकही प्रकल्प नाही.तरी देखील तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला नाही.
सन २०२१ साली तालुक्यात खरीप हंगामाच्या वेळेस अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गुलाबी वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाने मदत म्हणून ५० कोटी रुपये मदत म्हणून जाहीर केली होती.मात्र त्याचा फायदा अद्याप शेतकऱ्यांना झाला नाही.संबंधित खात्याचे आपण राज्याचे मंत्री आहात.तालुका दुष्काळ यादीत आला तर प्रत्येक बगायतदार शेतकऱ्याला ३ हेक्टर पर्यंत १८ हजार प्रती हेक्टर,कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार तीन हेक्टर पर्यंत तसेच फळबाग पिकांना हेक्टरी ३६ हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत म्हणजे अशा स्वरूपात तालुक्याला १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी तालुका दुष्काळ यादीत आला पाहिजेच त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेऊन अमळनेर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा.नाहीतर आपले मंत्री पद सोडावे असे आव्हान जिल्हा किसान काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांना केले आहे.


