*चारित्र्याच्या संशयावरून केली होती मारहाण! चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे मांडळ येथे ३१ वर्षीय विधवा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा छळ केल्याने सदर महिलेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन चार जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील ३१ वर्षीय अश्विनी अरुण पाटील यांच्या पतीचे सात वर्षापूर्वी निधन झाले होते व त्या सासरे व दोन मुलांसह राहून आशा स्वयंसेविका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या घराजवळ राहणारे दत्तात्रय महादू पाटील, चंद्रभागा दत्तात्रय पाटील, विठोबा दत्तात्रय पाटील, कीर्ती विठोबा पाटील यांनी सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचा मनस्ताप झाल्याने दिनांक १२ रोजी सदर महिलेने राहत्या घरात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेत जाळून घेतले. त्यात ती सत्तर टक्के भाजल्याने तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. मात्र दिनांक १७ रोजी उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानुसार महिलेचा भाऊ हितेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध मारवड पोलिसांत भादवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

