हरियाणा: पोलीस वृत्त ऑनलाईन– यमुनानगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये एकाच गावातील ४ जणांचा समावेश आहे. रवींद्र कुमार, सुरेश कुमार, सुरेंद्र कुमार, विशाल सरवन आणि मेहर चंद अशी मृतांची नावे आहेत, तर प्रिन्सची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रिन्स आणि विशाल हे दोघे चुलत भाऊ असल्याचे सांगितले जातं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. यमुनानगरचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने तपास केला. या प्रकरणी काही चौकशीही करण्यात आली आहे, मात्र पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.
यमुनानगर जिल्ह्यातील मांडेबारी आणि पणजेतो गावातील हे प्रकरण आहे. मांडेबारी गावात विषारी दारू पिऊन एकामागून एक ४ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मांडेबारी शेजारील पणजेतो गावातील माजरी येथेही दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
गावात बनावट दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर काही लोकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची दृष्टी गेली. काही लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेत एकाचा मृत्यू झाला.

