अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन- अमळनेर शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या वळणावर प्रवासी रिक्षा पलटी झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात प्रवासी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवाशी कलाबाई बुधा पाटील(Kalabai Buddha Patil)( वय – ५८) या आपल्या परिवारासह राहायला आहे. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कलाबाई पाटील ह्या कामानिमित्ताने खाजगी प्रवासी रिक्षाने अमळनेर येथून आपल्या गावी जात होते. त्यावेळी अमळनेर बसस्थानकात जवळील वळणावर प्रवासी रिक्षाचालक राजेंद्र रामदास भिल याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात कलाबाई पाटील खाली फेकल्या गेल्या. त्यातच ही रिक्षा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या दबल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान मयत महिलेच्या पुतणे योगेश रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक राजेंद्र रामदास भिल यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे करीत आहे.


