अमळनेर: पोलीस वृत्त- ऑनलाईन गुटखा बंदी केलेली असताना शहरात मात्र गुटख्याची सर्रास विक्री व साठे केले जात आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून तालुक्यात कायद्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे. अमळनेर शहर आणि ग्रामीण भागातील गल्लीबोळातही गुटखा विक्री केली जाते. व्यसनाच्या आहारी गेलेली तरूण पिढी अव्वाच्या सव्वा किंमतीला गुटखा विकत घेऊन खाताना दिसत आहे. गुटखा विक्रेतांना कायद्याची धास्ती नसल्याने खुलेआम गुटखा विकला जात आहे. एकेकाळी रूपयाला मिळणारी गुटख्याची पुडी बंदी असल्याने आता दहा रुपयांना विक्री होत आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई गुटखामाफिया करीत आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील काही मुुख्य भागात गुटख्याचा मोठा- मोठे साठे केलेला असतात. तर काही भागात डीलर नेमले असतात हे डीलर थेट शहरातील व ग्रामीण भागातील पानटपऱ्या पर्यंत गुटखा पोहोचवतात. गुटखा विक्री हा व्यवसाय पान टपरी वरच नव्हे तर किराणा दुकान जनरल स्टोअर्स यांच्यावर देखील होऊ लागला आहे. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कायद्याने या व्यवसायाला बंदी असताना खुलेआम गुटख्याचा साठा आणि विक्री होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात गुटखा विक्री जोमात चालले असून प्रशासन पूर्णपणे कोमात आहे असे चित्र दिसून येत आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे दुर्धर आजार कमी व्हावेत म्हणून शासन कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करीत असतानाच मात्र या कायद्याला धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे