नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमधील चुंचाळे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
भुजंग अश्रू तायडे ( वय 35) आणि पत्नी मनीषा भुजंग तायडे ( वय 30) अशी या पती- पत्नीची नावे आहेत. हे दांपत्य अंबड चुंचाळे येथील घरकुल इमारत क्रमांक 19 या ठिकाणी राहत होते. घटनेच्या दिवशी या दोघां पती-पत्नींमध्ये मोठा वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने भुजंगने मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आणि नंतर त्याने घराच्या किचनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. त्यांची दोन्ही मुले क्लासला गेले होते.
संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुले क्लासवरून आल्यानंतर त्यांनी दार वाजवलं. मात्र कुणीच दार न उघडल्याने त्यांनी शेजारच्यांना हि गोष्ट सांगितली. यानंतर शेजारच्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना मनीषा यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आढळून आला तर भुजंग याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. यानंतर नागरिकांनी याची माहिती अंबड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. अंबड पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. भुजंग आणि मनीषा यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडील सोडून गेल्याने हि दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

