जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये भक्ती योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे भक्त त्याच्या ईश्वराच्या चरणी संपूर्ण लीन होतो. कोणतेही प्रश्न, शंका-कुशंका किंवा चिकित्सा त्यात नसते, तर सम्पूर्ण समर्पण असते. प्रभू श्रीराम यांच्याप्रती नेहमी निस्सीम भक्ती ठेवली तर जीवनात निश्चितच यशस्वी, समाधानी आयुष्य लाभते, असे मार्गदर्शन हभप विशालशास्त्री गुरूबा यांनी केले.
येथील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीड़ा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तरुण कुढ़ापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद रामायण कथेचे दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तरुण कुढापा चौकात मनपा शाळा क्र. ३ येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे सातवे वर्ष आहे.
श्रीराम कथेच्या सहाव्या दिवशी हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. प्रभू श्रीराम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाला चार भाऊ होते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसर्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथे कधीही भांडणे होत नाहीत. रामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत.
श्रीराम नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले, तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्व दर्शवतो, असेही ते म्हणाले. कथेमध्ये रामभक्त हनुमान आणि साईबाबा यांचा सजीव देखावा उभारण्यात आला होता. हनुमानाच्या भूमिकेत गणेश रायसिंगे याने तर साईबाबांच्या भूमिकेत राजेंद्र पाटील यांनी प्रभावी भक्तीमय अभिनय सादर केला. शनिवारी राम आणि रावणाचे युद्ध तसेच श्रीरामांचा राज्याभिषेक हा देखावा राहील. संध्याकाळी ४ वाजता तरुण कुढापा चौक परिसरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
संध्याकाळी डॉ.रवींद्र महाजन, डॉ.निलेश चौधरी, जयेश भावसार, गजानन पाटील, संजय चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शनिवारी दि. ३१ डिसेंबर रोजी रामायण कथेत रावण वधाचा सजीव देखावा असणार आहे.


