तुम्हाला माहिती असेल, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, यासाठी राज्य सरकारने 6 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती.

मात्र, एप्रिल-2022 पासून ही योजना खंडीत झाली होती. दरम्यान राज्य सरकारने ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू केली आहे.
पहा या योजने विषयी
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास या योजनेतून दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. तसेच, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत केली जाते.
विशेष म्हणजे, विम्याचा हप्ता शासन भरत असल्याने शेतकऱ्याला पैसे भरावे लागत नाहीत.
शेतकरी अपघात विमा योजनेत – रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने, अंगावर वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, हिंस्र जनावरांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू, दंगल व अन्य अपघातांचा समावेश करण्यात आला आहे
योजनेचे नियम व अटी – मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा असावा. तसेच शेतकरी 10 ते 75 वर्षे वयोगटातील असावा.
अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो.
अर्जाचा नमुना कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळतो.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार अर्जाची प्राथमिक छाननी करून विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी प्रस्ताव पाठवितात. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही मदत दिली जाते.

