अमरावती:- शहरातील धक्कादाय घटना समोर आली आहे. पिंगळाई नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

स्थानिक प्रशासनाने बचाव पथकाला पाचारण करून मृतांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेली माहिती अशी की , तीन व्यक्ती मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकून बसले होते. जाळ्याची दोरी तुटल्याने एकाने दोरी काढण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, या ठिकाणी डोह व पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने बाहेर निघता आले नाही. त्यामुळे अन्य दोघांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
अमरावतीच्या शोध पथकाकडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तिघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाले भरून वाहत आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. असे असतानाही काही लोक जिवाची पर्वा न करता नदीकाठी जाण्याचा मोह सोडत नाही आहे.

