जळगाव: शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. ११) रात्रीपासून सूरू झालेल्या विजांच्या कडकडाटांसह धुवाधार पावसाने जिल्ह्यातील सहा महसुली मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
या पावसाने कापूस, केळी, मका, लिंबू बागांचेही नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने ७६६ हेक्टरवरील केळी, कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात (Jalgaon) जळगाव, भुसावळ, (Bhusalval)रावेर, (raver)मुक्ताईनगर, (mukatainagr)पाचोरा (Pachora) तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात पाठविला आहे. यात २२ गावे बाधित असून, एक हजार ३३६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटांमुळे अनेक ठिकाणी झाडे, झुडपे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक शेतात पाणी तुंबले आहे कापूस, केळी पिकांचे, सोयाबीनचे नुकसान झाले. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळून पिकांना फुलोर लागण्याची स्थिती आगामी काळात होणार आहे. रविवारी एकूण सरासरी २५ मिलिमीटर पाऊस झाला. रावेरला ६० मिलिमीटर, जळगावला ५१.८ मिलिमीटर, भुसावळला ३६ मिलिमीटर, चोपडा ४९, मुक्ताईनगर तालुक्यात ४०.३ पाऊस झाला.
भोकर, धानोरा, अडावद या महसूल मंडळांत ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊन ढगफुटी झाली. तर अंतुर्ली, ऐनपूर, खिर्डी, पिंप्राळा, रावेर, सावदा महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

