अमळनेरात डेंग्यू प्रादुर्भावामुळे आमदारांनी घेतली आढावा बैठक
अमळनेर-शहर व तालुक्यात डेंग्यू आजाराचा फैलाव होऊन यात शहरात काही दिवसांपूर्वी एक जण दगावल्याने आमदार अनिल पाटील यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेऊन प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी सूचना केल्या.
दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान डेंग्यू चा प्रादुर्भाव जास्त होत असतो,अमळनेरात गेल्या महिन्यापासून अनेकांना या आजाराने ग्रासले असून यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे,याशिवाय व्हायरल व इतर साथीच्या आजारांचे रुग्ण देखील वाढले आहे,याबाबत आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना राबवित आहे याचा आढावा घेण्यासाठी आमदारांनी ही बैठक आयोजित केली होती,यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी,नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ संजय रणाळकर यासह इतर डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते,यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आजाराची सद्यस्थिती आणि उपाययोजना बाबत संपुर्ण माहिती आमदारांना दिली,यावेळी आमदारांनी अजूनही काही भागात मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले, तसेच अनेकदा आवाहन करूनही काही नागरिक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना विरोध करून काळजी घेत नाहीत मात्र बहुसंख्य नागरिक पूर्णपणे नगर पालिकेला सहकार्य करून या मोहिमेत सहकार्य करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, व उपाययोजना आणि लोकसहभाग यामुळे डेंग्यू चा फैलाव आटोक्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदारांनी केल्या नागरिकांना सूचना,,, सदर बैठकीतील आढाव्यानंतर नागरिकांना आवाहन करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की शासकीय उपाययोजनांसोबतच लोकांसहभागातूनच खऱ्या अर्थाने आपण डेंग्यू पासून मुक्ती मिळवू शकतो कारण शेवटी आपली काळजी आपणच घेणे आवश्यक असते,कुणालाही तीन ते पाच दिवस मध्यम व जास्तीचा ताप आणि सोबतच डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ,भूख मंदावणे,अंगावर लाल पुरळ,रक्तस्त्राव अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविले पाहिजे,डासांची अंडी व लाव्हा नियंत्रणासाठी पाणीपुरवठा च्या एक दिवस आधी कोरडा दिवस पाळला पाहिजे,संपुर्ण परिसराने किंवा गावाने पाण्याचे भांडे ड्रम घट्ट झाकले पाहिजे,कापड बांधले पाहिजे,पावसाचे साचलेले पाणी व टायर मधील आणि डबक्यामधील पाण्याचा निचरा केला पाहिजे,आणि मुख्य म्हणजे शक्य असेल तेव्हा लोकसहभागातून संपुर्ण परिसर स्वच्छ केला पाहिजे, एवढी काळजी जरी आपण स्वतः घेतली तरी निश्चितपणे डेंग्यू किंवा इतर आजारांना निश्चितपणे आपल्या गावाबाहेर हद्दपार करू शकतो असे आमदारांनी सांगत डेंग्यू ला घाबरू नका त्यापासून आपला बचाव करा असे आवाहन आमदारांनी केले.