अकोला: नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा गुण न मिळाल्याने रोहिणी विलास देशमुख या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लाखो उमेदवार नीट परीक्षेला (NEET Exam) बसतात. नीट परीक्षा खूप कठीण राहते. राज्यात नीट परिक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, कमी गुण मिळाल्याने अकोल्यात रोहिणी विलास देशमुख या तरुणीने आत्महत्या (Suicide) केली. शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत तिने जीवन संपवले आहे. यापुर्वी रोहिणीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत ३५० च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला ४२० गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला ५६५ च्यावर गुणाची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण मिळाल्याने रोहिणी या तणावात होती.
पहाटे पाचलाच उठून गेली बाहेर
काल रात्री नियमितप्रमाणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. मात्र आज पहाटे ५ वाजता झोपेतून उठून बाहेर पडली नाही अन् या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

