युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष देत आहेत. अशात आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा करायला सुरुवात केली होती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो टाकून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारावर दादर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

