जळगाव पोलीस वृत्त न्यूज : सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय नवविवाहितेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मयुरी ठोसरे या विवाहित महिलेच्या बाबतीत घडली असून, तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना मयुरी ठोसरे हिने गळफास घेऊन आयुष्य संपवले.
फक्त चार महिन्यांपूर्वी, 10 मे रोजी मोठ्या थाटामाटात मयुरीचा विवाह सोहळा पार पडला होता. परंतु, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरकडून तिच्यावर सतत छळ सुरू झाला. पैशांच्या मागण्या वाढू लागल्या. या कारणावरून माहेरकडील व सासरकडील मंडळींमध्ये तीन वेळा तडजोडी झाल्या. मात्र, छळ थांबला नाही. अखेर या विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, 9 सप्टेंबर रोजी मयुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तिच्या माहेरकडून पैसे देऊन वाढदिवस साजरा झाला, अशी माहिती तिच्या भावाने दिली. पण वाढदिवसानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 10 सप्टेंबरला मयुरीने आत्महत्या केली.
घटनेनंतर मयुरीचा मृतदेह माहेरी मलकापूर येथे आणण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.
मयुरीच्या भावाने गंभीर आरोप करताना सांगितले की, तिचा मोठा दीर गणेश ठोसरे (ज्याचा पूर्वी घटस्फोट झालेला आहे) हा बहिणीसोबत अश्लील वर्तन करत होता. बहिणीने वारंवार फोनवरून त्याची तक्रार केली होती. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले, कारण मला वाटले की दीर-भावजय यांच्यात मस्करी होत असेल. मात्र, नंतर त्याचे वर्तन अधिकच बिघडले, असा आरोप भावाने केला आहे.
या प्रकरणी मोठा दीर गणेश ठोसरे, पती गौरव ठोसरे, सासू लता ठोसरे, किशोर ठोसरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयुरीचे आई-वडील आणि भावाने केली आहे.


