लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. लोणावळा पोलिसांकडून या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास सुरू आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी काल रात्री दोन्ही आरोपींना थेट गुन्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी नेल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री ११ वाजता घटनास्थळी चौकशी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचं एक विशेष पथक सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना घेऊन लोहगड परिसरात पोहोचलं. रात्रीच्या अंधारातच पोलिसांनी या दोन्ही आरोपींची लोहगडाच्या पायथ्याशी आणून कसून चौकशी केली. या गुन्ह्याची संपूर्ण साखळी जोडण्यासाठी पोलिसांनी दोघांना लोहगडावर आणलं होतं.
खरं तर, लोहगड किल्ल्यावर चढून जाण्यासाठी प्रामुख्याने दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आरोपींनी लोहगडावर जाण्यासाठी नेमका कोणता मार्ग वापरला, याचा शोध घेणं पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे होतं. पोलिसांनी घटनास्थळी सिया आणि चेतन या दोघांनी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अनुक्रमे निवडलेल्या विशिष्ट आणि वेगवेगळ्या मार्गांची सविस्तर माहिती गोळा केली. दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर मार्गांची माहिती दिल्यानंतर, त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या संपूर्ण हत्या प्रकरणात आता पोलिसांचा संशय आणखी वाढला असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पोलीस आता मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या आई-वडिलांचा देखील जबाब नोंदवणार आहेत. या हत्येमागे किंवा आरोपींना लपवण्यात पालकांचा काही संबंध आहे का, किंवा त्यांना या प्रेमसंबंधांची आणि वादाची आधीपासून कल्पना होती का, या बाजूनेही आता पोलीस तपास करत आहेत. केतन अग्रवालच्या या धक्कादायक हत्येमुळे पुणे आणि लोणावळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.



